पुणे : कोविड -19 संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या एनआयव्ही, बी.जे.मेडिकल (ससून हॉस्पिटल), एएफएमसी, एजी डायग्नोस्टीक, मेट्रोपोलिस तसेच खाजगी लॅबच्या डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर तसेच शासकीय व खाजगी लॅबचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
कोविड-19 संशयीत रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी लॅबमध्ये दररोज किती नमुने तपासणीसाठी प्राप्त होतात, त्यापैकी किती नमुने तपासले जातात आदि विषयांबाबतचा आढावा डॉ.म्हैसेकर यांनी यावेळी घेतला. रुग्णांच्या स्वॅबची तपासणी गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
फ्ल्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्ण तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांनी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने फ्ल्यूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्ण तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांनी स्वतंत्र कक्ष (ओपीडी) तात्काळ स्थापन करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खाजगी रुग्णालय प्रमुखांना केल्या. खाजगी रुग्णालयांनी कोविड-19 संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने मान्यता प्राप्त लॅबकडून तपासून घेवून अहवाल मागवावा तसेच पॉझिटीव्ह रुग्णांचा चाचणी अहवाल तात्काळ जिल्हा परिषदेच्या एकात्मिक साथ रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) कक्षाकडे पाठवावा, जेणेकरुन कोरोना सांसर्गिक रुग्णांवर वेळेत उपचार करणे सोयीचे होईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.राम यांनी यासंबंधी विविध विषयांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही यावेळी आवश्यक त्या सूचना केल्या.