Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुळ वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचे रहिवासी असलेल्या अग्रवाल बंधू यांच्या अजंता फार्मा या कंपनीनं समता फाऊंडेशनच्या  माध्यमातून नऊ कोटी रुपयाची मदत दिली आहे. यातील साडेतीन कोटी रूपये प्रधानमंत्री सहायता निधीला, एक कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर दमण दीव प्रशासनाला ५० लाख रुपये दिले आहेत. याबरोबरच चार कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणं, ज्यामध्ये व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षा किट दिले असून त्यांच्यातर्फे वाशिम  जिल्हा प्रशासनामार्फत गरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील  शाहिद जवानाच्या पत्नी मंगल सुनील वलटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत दिली आहे. रविवारी त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. सहा महिन्यापूर्वी भारतीय लष्करातले जवान नायब सुभेदार सुनील वलटे हे शहीद झाले होते.

अमरावतीतल्या रूधिरा जितेंद्र दखणे या पाच वर्षाच्या मुलीनं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यसरकारला मदत म्हणून आपल्या पिगी बँकेत बचत केलेली तीन हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातल्या आष्टी पोलिसांनी अन्नधान्याच्या ५०० पाकिटांचे वितरण केले आहे. गरीब, विधवा, ज्येष्ठ नागरिक, शेत मजूर, विस्थापित कामगारांना या अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. आष्टी आणि जवळपासच्या ३८ गावांमध्ये या धान्याच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.

नाशिक शहरात संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका सेवाभावी संस्थेच्या वतीनं घरपोच औषधे देण्याची व्यवस्था केली आहे. नाशिकच्या अंजूमन ए हकीमी दाऊदी बोहरा ट्रस्ट, गरजू रुग्णांना घरपोच औषध पुरवणार आहे. ‘स्टे होम स्टे सेफ’ असा संदेश देत ट्रस्टकडूनया सेवेसाठी सैफी अॅम्बुलन्स मेडिकल गट तयार करण्यात आला असून, या गटांतर्गत ६५ पॅरामेडिकल्स आणि तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या ट्रस्टनं रुग्णांना घरपोच औषध देण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे.

नाशिकमधले  कोरोना संसर्ग संशयित आणि बाधित रुग्णांची चाचणी घेऊन प्रत्यक्षात उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ३०० अत्यावश्यक सुरक्षा साधनं म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. याशिवाय ५ हजार एन ९५ मास्क आणि ५० हजार तीन पदरी मास्क शिवाय एक्स रे फिल्म यासह अन्य साधनांचा समावेश आहे.  दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांसाठी देवळाली कॅम्प इथल्या बोर्न स्कुल मध्ये तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

Exit mobile version