नवी दिल्ली : कोविड -19 महामारीविरोधात भारत लढा देत आहे आणि यासंदर्भात देशात अग्रस्थानी सेवा बजावत असलेले कर्मचारी कोविड संबंधी मदत कार्यात सहभागी झाले असून ते प्रशंसनीय काम करत आहे. मात्र महामारीच्या पुढच्या टप्प्यात कोविडचा संसर्ग झालेल्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता अधिक मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
त्यानुसार, या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कोविड हा महामारीचा रोग प्रभावीपणे हाताळण्यासाठी अग्रस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या दिक्षा मंचावर ‘इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग’(iGOT) नावाचे एक प्रशिक्षण मॉड्यूल सुरु केले आहे. डॉक्टर्स , परिचारिका, निमवैद्यकीय पथक, स्वच्छता कामगार, तंत्रज्ञ, सहाय्यक नर्सिंग मिडवाइव्ह्स (एएनएम), राज्य सरकारचे अधिकारी, नागरी संरक्षण अधिकारी, विविध पोलिस संघटना, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), राष्ट्रीय सेवा योजना, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, भारत स्काउट्स आणि गाईड्स आणि अन्य स्वयंसेवकांसाठी iGOT पोर्टलवर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
पोर्टल वेबसाइटची लिंक https://igot.gov.in/igot/. आहे. या मंचावर प्रशिक्षण मॉड्युलसाठी वेळेची ठराविक मर्यादा असेल आणि ऑन साइट आधारावर प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून या महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात तैनात करता येईल.