Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जंतुकीकरणासाठी ड्रोनचा वापर

लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यंमत्री श्री. टोपे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईचे लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत, त्यांनी त्यांची निरीक्षणे मांडली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने झाले पाहिजे. ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे.

गर्दीचे संनियंत्रण महत्त्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय झाला. सीसीटीव्ही, एसआरपीएफ,ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी जे सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये आहेत, त्याचा वापर दिवसभरात मोठ्या प्रमाणावर होतो अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वच्छ करणे. ड्रोनचा वापर करून निर्जुंतकीकरणासाठी फवारणी  करण्याचे काम करावे, असे यावेळी सांगण्यात आले.

मुंबईतील गर्दीच्या भागातील नागरिकांना शासनाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तयार अन्न घरपोच देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अगदी छोट्या खोलीत जास्त संख्येने लोक राहतात त्यामुळेही काही लोक रस्त्यावर दिसतात अशा लोकांसाठी त्या भागातील शाळा उपलब्ध करून दिल्या. तेथे सामाजिक अंतर पाळत त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली.

Exit mobile version