Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मायेचा निवारा आणि माणुसकीची प्रचिती…

किनवट प्रशासन करतंय 73 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय…

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉक डाऊननंतर अनेक लोक रोजगारासाठी इतर राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये अडकलेले होते. या अवस्थेत जिल्हाबंदी आणि राज्याच्या सीमाभाग प्रवेशासाठी बंद झाल्याने या नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली.

किनवटमध्ये दोन निवारा गृहांमध्ये सोय केली असून यामध्ये इतर राज्यातून एकूण 73 व्यक्तींची संख्या आहे. शिवाजी मंगल कार्यालयात राजस्थानमधील 36 व गुजरातमधील 2 तसेच दुसरे निवारा गृह हे शासकीय आश्रम शाळांमध्ये तयार केले असून 33 नागरिकांची सोय यामध्ये करण्यात आली आहे. ठिकाणी राजस्थानमधील दोन, बिहार मधील 7, उत्तर प्रदेश मधील 3 आणि मध्यप्रदेश मधील 21 अशा विविध राज्यातील नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही निवारा गृहांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा-नाश्ता तसेच स्वयंसेवी संस्थांकडून फळे पुरवण्यात येतात. त्याचप्रमाणे दिनचर्येमध्ये सकाळी योगाचे प्रशिक्षण वर्ग दररोज घेतले जातात. या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले असून त्यांच्या दोन्ही निवारागृहांच्या ठिकाणी फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले आहे.

व्यक्तींना मानसिक आधार मिळावा म्हणून प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. जेणेकरुन त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना येऊ नये तसेच मनोरंजनाची सुविधा म्हणून टीव्ही बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या 73 जणांची आरोग्य तपासणी केली असून आरोग्याच्या बाबतीतही किनवट प्रशासन जागरुकतेने व आस्थेने लोकांची काळजी घेत आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारीदेखील आहेत.

या नागरिकांपैकी मोहम्मद शकील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “सर्व व्यवस्था उत्तम केली असून आमची खूप छान काळजी घेतली जाते. आरोग्य तपासणी करुन आमच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.”

माणूस कितीही बदलला, प्रगत झाला तरी माणसातील माणूसपणाची संवेदना आजही जागृत आहे. तीच संवेदना घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाअंतर्गत किनवट प्रशासनाने या नागरिकांची ज्याप्रकारे मायेने आणि आपुलकीने व्यवस्था केली, यावरुन असे म्हणता येईल की प्रशासनाचा मानवी चेहरा संवेदना जपत जबाबदारीने काम करत आहे आणि गरजूंना मायेचा निवारा व माणुसकीची प्रचिती देत आहे.

Exit mobile version