मुंबई : कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 75 हजार रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती अंजना प्रसाद आणि सचिव डॉ. राखी गुप्ता यांनी यासाठीचा धनादेश राज्याचे गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. संजय कुमार यांच्याकडे सुपुर्द केला.
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या पत्नींची ही संघटना असून विविध सामाजिक कार्यात संघटना सहभागी असते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राज्यशासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरीत कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतुनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात आली.