पुरवठा साखळी व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक
प्रादेशिक भाषांमधून संपर्क साधत शेवटच्या स्थळापर्यंत जनसंवाद साधण्यावर भर
नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट तयार केले असून या सर्व गटांना विविध कामे सोपवण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत या गटांच्या कामांचा आढाव घेण्यात आला. या आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रभावाला आला घालण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकसत्रातली ही सर्वात अलीकडच्या घडीतली बैठक होती.
यावेळी विविध मंत्रिगटांनी घेतलेल्या प्रयत्नांचा प्रधान सचिवानी आढावा घेतला. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि व्यवस्थापन याच्याशी संबंधित प्रश्न, या साखळीत सहभागी सर्वांच्या मदतीने सोडवणे, सामाजिक अंतर राखून शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने आणि पिके काढण्याबाबत मदत करणे, या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना खालच्या स्तरापर्यंत पोहचवणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना करणे, यावर चर्चा झाली. त्याशिवाय, कोरोनाच्या चाचण्या करताना प्रोटोकॉल आणि पद्धती पाळण्याबद्दल देखील, यावेळी चर्चा होऊन, त्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले. आतापर्यंत देशात प्रोटोकॉलनुसार 1,45,916 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेले स्थलांतरित मजूर आणि बेघर लोकांसाठी तातडीने निवाऱ्याची सोय करण्याचे निर्देश सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच, त्यांच्या व्यवस्थेच्या कामाविषयीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने राज्ये आणि जिल्हा प्रशासकाच्या संपर्कात आहे. PPE चे उत्पादन युद्धपातळीवर सुरु असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीचेही काम होत आहे. स्वयंसेवी संस्था आणि समाजिक गटांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. कामांचे दुहेरीकरण आणि गोंधळ टाळण्यासाठी, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या कामात व संसाधनात सुसूत्रता आणावी अशी सूचना प्रधान सचिवांनी केली.
पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना आणि आर्थिक मदतीचे पैकेज गरिबांपर्यंत पोहचवण्याच्या प्रक्रियेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. उचित लाभार्थ्यांपर्यंत योजनेचे लाभ पोहचवण्याच्या दृष्टीने डेटा आणि आकडेवारी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रधान सचिव यावेळी म्हणाले.
सरकार या काळात करत असलेल्या उपाययोजना, आजाराविषयीची माहिती आणि उचललेल्या पावलांची माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रादेशिक भाषांमधून जनसंपर्क साधण्यावर यावेळी भर देण्यात आला. तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन क्षेत्रातल्या प्रयत्नांविषयी बोलतांना आरोग्य सेतू APP सुरु करण्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले तसेच हे APP अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.