आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधत विभागातील कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य पुरवठा अशा विविधब बाबतीत आढावा घेतला.
केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार कोरोना आजारावरील उपचार पध्दतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीतील अत्यावश्यक सेवा सुविधा याबाबत विभागातील पाचही जिल्हयातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे आयुक्तांनी चर्चा करुन सूचना दिल्या.
यावेळी पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांची उपस्थिती होती. तसेच सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णाची कोवीड केअर, कोवीड आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय विभागणी करुन रुग्णांवर वैद्यकीय उपचार करावेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होऊन रुग्णांची सौम्य ते गंभीर अशा स्तरावर विभागणी होऊन उपचार करण्यास सुलभता येईल. विभागांतर्गत सर्व जिल्हयातील औषध पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषधांचा साठा याबाबत त्यांनी यावेळी माहिती घेतली. विभागात अडकलेले प्रवासी, मजूर यांची अन्न व निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन बेघर नागरिकांचीही नाईट शेल्टर अथवा शाळेत निवारा व भोजनाची व्यवस्था करावी, असे सांगितले. साखर कारखाना क्षेत्रातील मजूर स्थलांतरीत होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांचीही निवास व भोजनाची व्यवस्था करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
‘आशा ’वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी ज्यांचे स्वास्थ्य उत्तम असून त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अथवा कोणताही गंभीर आजार नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तपासणीची कामे करुन घेण्याबाबत सूचना केल्या.
14 एप्रिल नंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्पयाने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नसल्याने विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल ,याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा. पुणे जिल्हयातील उप बाजार, आठवडी बाजार पूर्णत: बंद केले असून आजवर आवक झालेल्या मालाची विक्री होईपर्यंतच भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करुन द्यावा. अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू , औषधे, लिक्वीड सोप, साबण, तेल, दूध यांचा सुरळीत पुरवठा ठेवण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत. कारण कोरोना विषाणू बाधित मृत व्यकतीमुळे विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही नातेवाईकाला कोरोनाबाधित शव ताब्यात मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाबाधित शव दफन करावयाचे असल्यास शहरापासून दूर अशा ठिकाणी 6 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये निर्रजंतूक लिक्वीड टाकूण हे शव प्लॅस्टीकच्या दोन बॅगात घालून त्याचे दफन करावे, अशाही सूचना डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.