Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी ; राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर याकरिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 161 गुन्हे 9 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत.

राज्यातील दाखल गुन्हे

राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बीड 22, कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 12, मुंबई 11, जळगाव 10, जालना 9, नाशिक ग्रामीण 8, सातारा 7, नांदेड – 6, नागपूर शहर 5, नाशिक शहर 5, परभणी 5 ठाणे शहर 4, बुलढाणा 4, गोंदिया 3, भंडारा 3, अमरावती 3, लातूर 3, नंदुरबार 2, नवीमुंबई 2, उस्मानाबाद 2, हिंगोली 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 89 गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 36 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर, बीड, जालना, लातूर, जळगाव, परभणी, पुणे ग्रामीण या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी आपल्या फेसबुक/व्हाट्सॲप व अन्य सोशल मीडियाचा (social media )वापर करून कोरोना संकटाला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या, ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

मुंबईत कुलाबामध्ये एक गुन्हा

मुंबईमध्ये काल कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने एका विशिष्ट मेडिकल स्टोअरच्या स्टाफला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे व त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने या दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करू नये अशा आशयाचा खोटा मेसेज व्हाट्सॲपद्वारे सगळीकडे पसरविला होता.

महाराष्ट्र सायबर असे नमूद करू इच्छिते की, सध्याच्या कोरोना संकटाच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, तसेच याला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत.

व्हाट्सॲप वापरताना घ्यावयाची दक्षता

तुम्ही व्हाट्सॲप ग्रुपचे सदस्य असाल तर हे करावे :

तुम्ही ग्रुप ॲडमिन, ग्रुप निर्माते (creator) असाल तर काय करावे?

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना सूचित करते की, कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरविणे, खोटी/चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल व त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त रहावे.

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की, कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सॲप किंवा अन्य समाजमाध्यमांवर (social media) पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे. असे आवाहन सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version