मुंबई : राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी. पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किट्सही उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली.
कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. मुंबईमधील वाढ चिंताजनक असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य शासनामार्फत अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. कंटेनमेंट सर्वेक्षण कृती योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किट्स, एन 95 मास्क याबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच नोंदविली असून हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोयीचे होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
देशात, राज्यात ज्या पीपीई किट्स उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे जेणेकरून त्यांना उत्पादन करणे शक्य होईल, अशी मागणी करतानाच रॅपिड चाचणी कधी करायच्या या बाबतीत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचनांसोबतच त्यासाठी लागणारे किट्सदेखील उपलब्ध करून द्यावे, असे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.