Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या संबोधनात ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आपण त्यांना हा निर्णय सांगितला असल्याचं ते म्हणाले. या वाढलेल्या कालावधीचं स्वरुप कसं असेल, विविध परिक्षा, मजूर आणि उद्योगधंद्यांसाठी काय करायचं याविषयी दोन तीन दिवसांत सांगू असं ते म्हणाले. काही ठिकाणी ही संचारबंदी शिथिल करण्याविषयीही विचार करू, मात्र जिथे गरज आहे तिथे ती अधिक कडक केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातल्या मृत्युचं प्रमाण अधिक असलं तरी ज्येष्ठ आणि अनेक व्याधींनी त्रस्त लोक त्यात आहेत त्यामुळे या पुढच्या काळातही घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी असं ते म्हणाले. मुंबईत रुग्णसंख्या हजारांवर गेली आहे, मात्र त्यातल्या ७० टक्के बाधितांमध्ये सौम्य लक्षणं आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोना प्रसाराचा वेग काहीसा कमी राखता आला असला तरी, गाफील राहून चालणार नाही, सतर्क राहून प्रयत्न केले तर राज्य कोरोनाविरोधातला हा लढा नक्की जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संचारबंदीच्या काळात शेतीची कामे त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा सुरळित ठेवला जाईल असंही ते म्हणाले. ही संचारबंदी वाढवली असली तरी या काळात आपण शिस्त पाळणं आवश्यक असून, त्यावरच या संचारबंदीचा कालावधी अवलंबून आहे असंही त्यांनी सांगितलं. सरकार या लढ्याची जबाबदारी घेत आहे, आपणही खबरदारी घ्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
राजकारण आयुष्यभर करता येईल, मात्र ही वेळ राजकारणाची नाही, त्यामुळे आपलं सरकार कोरोनावर कोणतंही राजकारण करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Exit mobile version