मुंबई (वृत्तसंस्था) : कोणतेही संकट हे माणसातील लढण्याच्या शक्तीला प्रेरणा देणारे असते. अट एकच असते की तुम्ही त्या संकटाने विचलित न होता त्याला संधीच्या स्वरुपात पाहिले पाहिजे.मग त्या संकटातून तुमच्या लढण्याची क्षमता तर वाढतेच पण इतरांनाही ती सहाय्यक, प्रेरक ठरते. आज सगळं जग कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. यात प्रत्येक जण आपल्या परीने काही तरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये स्वतः कष्टाचे, काटकसरीचे संघर्षमय जीवन जगत असताना या संकटाच्या वेळी आपण आपल्या गावासाठी, लोकांसाठी काय करु शकतो, या माणुसकीच्या विचारातून मास्क तयार करुन गावकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या संकल्प स्वयं सहायता समूहातील महिला दखलपात्र ठरतात.
कोरोनाच्या आजारामुळे आमच्या गावात खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.बाहेर जाऊन काही काम धंदा करणे आम्हाला शक्य नव्हते.रोज या आजाराची भीती वाढवणाऱ्या बातम्या आम्हाला ऐकायला येत होत्या .त्यातून या आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे खूपदा ऐकायला येत होतं. हाताला काही काम नाही पण अवतीभवती रोगाची भीती मात्र आहे .आता काही दुसरं काम तर आपण करु शकत नाही, पण गावात आपल्या लोकांसाठी काही करता येईल का, असा विचार आम्ही करत होतो.आम्हाला शिवणकाम करता येते . ते आपल्याच घरात बसून करता येतं त्यासाठी गर्दीत जायची पण गरज पडत नाही. मग त्या कामातून काही चांगलं करता येईल का या विचारातून या समूहातील सविता मारकळ,जयश्री मारकळ,स्वाती गवळी,मीना बनकर,रेखा बनसोडे,वैशाली वाडेकर यांनी मास्क शिवून तयार करण्याचे काम चांगले उपयोगात येईल असा विचार केला. सुरुवातीला काही मास्क या महिलांनी स्वखर्चातून स्वतः शिवून तयार केले. दोन-तीनशेहून अधिक मास्क गावकऱ्यांना महिला समूहाने मोफत वाटले. त्यांच्या या उपक्रमाची माहिती गावाजवळील कल्याणी मेडिकल स्टोअर्स चालकाला कळाली.कोरोनाच्या प्रसारास रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपायांपैकी मास्क वापरणे गरजेचे असल्याने मास्क विक्रीची गरज लक्षात घेऊन मेडिकल चालकाने या महिला समूहाला मास्क तयार करुन देण्याचे काम दिले. ते काम या समूहाने यशस्वीरित्या पूर्ण केले.त्यानंतर इतर दोन मेडिकलला मास्क करुन दिले.सोबतच रामपुरी ,केसापुरी सारख्या तांडा वस्ती असलेल्या ग्रामीण भागात छोट्या दुकानांमध्येही त्यांनी मास्क तयार करुन दिले. आतापर्यंत 800 मास्क गावातील लोकांना या महिला समूहाने तयार करुन उपलब्ध करुन दिले .
कोरोनामुळे सगळीकडे काम धंदे बंद झाल्याने आमच्या अडचणीत वाढच झाली. कारण आम्हा कुणालाच कायमस्वरुपी काम नाही .रोजमजुरी , मिळेल ते काम करत आम्ही आमचा आणि कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असतो .पण या कोरोना आजाराच्या संकटात रोजच्या कामाचे सगळे मार्ग बंद झाले होते. त्यात मास्क तयार करुन देण्याचे काम आम्ही करू शकलो. त्यातून थोडासा पैसा मिळाला.आम्ही जास्त नफा न कमावता योग्य भावात मास्क उपलब्ध करुन दिले आहेत. तर काही तांडा वस्ती भागात गावकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन कमी दरानेही मास्कचा पुरवठा केला आहे. आमच्या मास्क विक्रीपेक्षा आम्हाला आमच्या समूहातील महिलांकडून छोटंसं का होईना ,पण या आजाराच्या संकटात काहीतरी उपयोगी काम करता येतंय, याचा आम्हाला जास्त आनंद आहे.त्याचे समाधान आम्हाला कायम लक्षात राहील, अशा भावना सविता मारकळ यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत औरंगाबाद तालुक्यातील दौलताबाद या गावात संकल्प महिला स्वयं सहायता समूहाची स्थापना चार महिन्यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये झाली असून या समूहात १२ महिला सदस्य आहेत. सर्व महिलांची परिस्थिती हलाखीची असून या महिला स्वतःच्या पायावर उभे राहात कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची जबाबदारी पार पाडत आहे. आपली ही आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी समूह भावनेतून एकत्र येत या महिलांनी सामाजिक बांधीलकीतून मोफत मास्क देत गावकऱ्यांना मास्क वापरण्यासाठी जे प्रोत्साहन दिले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. निराश परिस्थितीत खचून न जाता प्रत्येकाने आपल्या परीने लढले पाहिजे, टिकून राहिले पाहिजे ही प्रेरणा स्वतः अभावाचे जगणे जगत असताना स्वतःच्या कृतीतून या संकल्प महिला समूहाने सहजतेने दाखवली आहे.