नवी दिल्ली : देशातल्या अनेक भागांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेने जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पाण्याची केवळ समस्याच नव्हे, तर पाणी वाचवण्याच्य उपायांवरही लक्ष केंद्रीत करणारी जनजागृती मोहीम सुरु करायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रथमच संवाद साधला त्यावेळी पंतप्रधानांनी हे आवाहन केले. जलसंवर्धनाच्या या कार्यात समाजाने एकजुटीने सहभागी व्हावे आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी संबंधित लोकांनी जलसंवर्धनासाठीच्या चळवळीत पुढाकार घ्यावा, असे पंतप्रधानांनी सुचवलं.
जलसंवर्धनासाठी शतकानुशतकं वापरात असलेल्या पारंपरिक पद्धतींचे आदान-प्रदान करा असे सांगून, यासाठी पोरबंदर मधले 200 वर्षापासूनचे तळे अद्यापही पाणीसाठ्याकरीता वापरात असून, पावसाच्या पाण्याचा वापर करण्याची यंत्रणा यात आहे, असे सांगून त्याला भेट देण्याची सूचना त्यांनी केली.
जलसंवर्धनासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती परस्परांना द्यावी, यासाठी #JanShakti4JalShakti हॅशटॅगचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
पाणीटंचाईवर देशभरासाठी एकच तोडगा असू शकत नाही. पावसाच्या केवळ आठ टक्के पाण्याचे हार्वेस्टिंग केले जाते, याचे आश्चर्य वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पाण्याशी संबंधित मुद्यांच्या वेगवान निपटाऱ्यासाठी नवे जलशक्ती मंत्रालय सुरु करण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यासंदर्भात सर्व सरपंच आणि ग्रामप्रधानांना आपण पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वंकष आरोग्यविषयी जागृती वाढत असून, यामुळे योगसाधनेला अधिकच झळाळी प्राप्त झाली आहे. आरोग्यसंपन्न समाजासाठी आरोग्यदायी नागरिक आवश्यक असतात आणि योग अभ्यासामुळे या तत्वाची निश्चिती होते. योग अभ्यासाचा प्रसार आणि प्रोत्साहन म्हणजे समाजसेवेचे मोठे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. भारतामध्ये हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत, सियाचिनपासून ते पाणबुडीपर्यंत, हवाई दलापासून ते एअर क्राफ्टकॅरियरपर्यंत, एसी जिमपासून ते राजस्थानातल्या तापलेल्या वाळवंटापर्यंत, गांवांपासून ते शहरांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी फक्त योग केला, असं नाही, तर योग दिवस सामूहिक स्वरूपात जोरदार साजरा केला गेला.