Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फूडपॅकेटसाठी फक्त गरजूंनीच संकेतस्थळांवर संपर्क साधावा : तहसीलदार गायकवाड यांचे आवाहन

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले, परराज्यातील स्थलांतरित मजूर, निराधार, रेशनकार्ड नसलेले आणि गोरगरीब अशा गरजू नागरिकांनीच पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या संकेतस्थळावर फूडपॅकेटसाठी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिदार गीता गायकवाड यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे अन्नधान्यावाचून हाल होऊ नये. कुणीही उपाशी राहू नये. यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात आले. या संकेस्थळाद्वारे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हातावर पोट असलेले, निराधार, मजूर, रेशनकार्ड नसलेले आणि गोरगरीब अशा गरजू नागरिकांना धान्य व अन्नपदार्थ पोहोच करण्यास १० एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला.

पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये असंख्य गरजू नागरिकांपर्यंत फूडपॅकेट पोहोचले. मात्र, काही ठिकाणी गरीब असल्याचे सांगून सधन असलेले नागरिकही फूडपॅकेट घेण्यासाठी आल्याच्या तक्रारी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा काही बोगस लाभार्थी घेऊ पाहत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या संकट काळात खरोखरच गरिब असलेल्या नागरिकांना ही मदत मिळने गरजेचे आहे. त्यामुळे फक्त खऱ्या गरजू नागरिकांनीच मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गायकवाड यांनी केले आहे.

शासन निर्णय दि. ९ एप्रिल २०२० अन्वये नोव्हेल कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी ) शिधापत्रिकाधारकांना मे व जुन -२०२० या दोन महिन्याच्या कालावधी करिता सवलतीच्या दराने अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. तसे आदेशही शासनाकडून दिले आहेत. याचा संबंधितांनी लाभ घ्यावा. अशी माहिती तहसिदार गीता गायकवाड यांनी दिली.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScNC44xfzZ2x8sclwCcqe99IFilxHqAT6_hmFE5JnWGeDMxKQ/viewform

 

Exit mobile version