पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रथमच संवाद साधला. डीडी न्यूजवरुनही झालेले या कार्यक्रमाचे प्रसारण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले.
पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे जलसंवर्धनाच्या गरजेवर जावडेकर यांनी भर दिला. ‘मन की बात’ हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते श्रोत्यांशी बोलत होते.
“पाण्याच्या कमतरतेमुळे देशाच्या अनेक भागामध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो. वर्षभर जेवढा पाऊस आपल्याकडे पडतो, त्यापैकी केवळ आठ टक्के पावसाचे पाणी आपण वाचवतो, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त आणि फक्त आठ टक्के पाण्याची बचत आपण करतो, म्हणूनच आता या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. आपण सर्वांनी इतर अनेक समस्यांवर ज्याप्रमाणे जनभागीदारीतून, जनशक्तीतून उत्तर शोधून काढले, त्याचप्रमाणे पाणी समस्येवर एकशे तीस कोटी देशवासिय सर्व सामर्थ्यानिशी, सर्वांच्या सहकार्याने आणि दृढ संकल्पाने उत्तर शोधून काढतील”, असे पंतप्रधान म्हणाले.