Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘लॉकडाऊन’नंतर नांदेडमध्ये अडकलेल्यांची मिशन मोडवर आरोग्य तपासणी

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे गुरुद्वारा. या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये माथा टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात. देशात लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या नागरिकांची सोय प्रशासनाने केली, यामध्ये  तीन हजार सातशे पंचावन्न नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

या दरम्यान सर्व संगतमधील यात्रेकरूंचे जवळपास ३७५५ जणांची आरोग्य तपासणी नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी  तीन दिवस दि 5 ते 7 एप्रिल असे सलग चार टीम काम करीत होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मल गनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरूंची आरोग्य तपासणी तसेच महानगरपालिकेच्या  क्षेत्रात आठ हजार तीनशे पंचावन्न  नागरिकांना  शहरी भागात घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे दैनंदिन भेटीद्वारे आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींविषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे .

 

नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांचे देखील विलगीकरण  करण्यात आले असून यामध्ये 130 नागरिकांचा  समावेश आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून  या बरोबरच नांदेड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी कोरोनाच्या संसर्गाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जाणीव जागृती करण्याचे काम नांदेड आरोग्य यंत्रणा करीत आहे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग हा जगासमोरील आताची सर्वात मोठी आपत्ती आहे, पण देश आणि राज्य पातळीवर  प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा सतर्कतेने काम करताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्याने आरोग्यविषयक काळजी आणि त्याप्रमाणे उपाययोजना केल्यामुळे आतापर्यंत  नियंत्रण मिळवले आहे.  संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या  समन्वयाने  आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य यंत्रणेने काम केल्याने सर्व परीचारिका ,आशा कार्यकर्त्या, डॉक्टर, यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

Exit mobile version