Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नसल्याचा केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बंध नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. या वाहनांच्या वाहतुकीवर कुठलेही निर्बंध आणू नये असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्यांना केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक कामगारांना कामाच्या ठिकाणी जाताना कुठलेही अडथळे येणार नाही याचीही काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले असल्याची माहिती सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी राज्य सरकारांकडून प्रयत्न सुरू आहेत, असेही त्या म्हणाल्या.
देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसोबत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनाही या विषाणू संसर्गाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एम्ससारख्या संस्थांना राज्यं वाटून दिले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ६०० हून अधिक रुग्णालयांमध्ये १ लाखाहून अधिक बेड्स उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
Exit mobile version