नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदीचे उल्लंघनाचे 35 हजार गुन्हे पोलीसांनी दाखल केले आहेत. 22 मार्च पासून सुमारे अडीच हजार जणांना अटक करण्यात आली तर पोलीसांवर हल्ला केल्याची 70 प्रकरणं दाखल झाली आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. क्वारंटाईन आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल 475 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अवैध वाहतुकीचे 803 गुन्हे दाखल झाले असून 19 हजार 675 वाहनं जप्त करण्यात आली आणि त्यांच्या मालकांकडून 1 कोटी 23लाख रुपये दंड पोलीसांनी वसूल केला. राज्यातल्या विविध नियंत्रण कक्षांमधे मिळून 61 हजार फोन कॉल्सला प्रतिसाद देण्यात आला. कर्तव्य बजावताना 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी सुरू असताना दुकानं उघडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंधरा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात स्वस्त धान्याची अतिरिक्त दराने विक्री करीत असल्याचे आढळून आल्यानं तहसीलदार विजय अधाने यांनी या दोन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.