Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करा

पिंपरी : महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीचे काम जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

भीमसृष्टीच्या कामकाजाचा आढावा व तेथे उभारण्यात येणाऱ्या म्युरल्सच्या मसुद्याचे वाचन महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. त्यावेळी सूचना दिल्या. आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, समितीचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, डॉ. राजाभाऊ भैलुमे, शिल्पकार आणि चित्रकार डॉ. गुरुगोविंद आंबरे, वस्तूविशारद गिरीश चिद्दरवार आदी उपस्थित होते.

या भीमसृष्टीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एकूण 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. म्युरल्सचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित स्थापत्य विषयक कामे जुलै महिना अखेर पूर्ण करण्यात यावे. म्युरल्सची माहिती मराठी बरोबरच इंग्रजीमध्ये असावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

म्युरल्स समवेत लावण्यात येणाऱ्या मसुद्यातील मजकूरावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये काही दुरुस्त्या आमदार गौतम चाबुकस्वार यांनी सुचवल्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. भीमसृष्टीचे उद्‌घाटन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन करावे. त्यादृष्टीने तयारी करावी. तर, भीमसृष्टीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करावे अशी मागणी उपस्थित सदस्यांनी केली.

Exit mobile version