Site icon साप्ताहिक एकच ध्येय

व्हिडीओ कॉन्‍फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर

पुणे : कोरोना विषाणू आजाराच्‍या अनुषंगाने वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत करण्‍यात आल्‍याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्‍य सचिव अजोय मेहता यांनी घेतलेल्‍या व्‍हीडिओ कॉन्‍फरन्सिंगमध्‍ये त्‍यांनी ही माहिती दिली. यावेळी पुण्‍यातून पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुण्‍याचे मनपा आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्‍णोई, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्‍य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, जिल्‍ह्यात तसेच विभागात ऊसतोड कामगार मोठ्या संख्‍येने असून त्‍यांना भोजन तसेच निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. परप्रांतीय मजुरांनाही भोजन व निवास सुविधा देण्‍यात आली आहे. अन्‍न-धान्‍याबाबत कोणतीही टंचाई नसून भारतीय अन्‍न महामंडळाकडून तांदूळ उचलण्‍याचे काम सुरु झाले आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या निर्णयानुसार एप्रिल महिन्‍याच्‍या अन्‍नधान्‍याचे 91 टक्‍के वाटप झाले आहेत. खरीप पूर्व हंगामाबाबत डॉ. म्‍हैसेकर यांनी खत, बी-बियाणे याबाबत माहिती दिली. खतांचा साठा पुरेसा असून बी-बियाण्‍यांबाबत नियोजन करण्‍यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्‍या कामांबाबतही आवश्‍यकती दक्षता घेण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कोरोना रुग्‍णांच्‍या सेवेसाठी काही वॉर्डबॉय, परिचारिका, कार्डीओलॉजिस्‍ट स्‍वत:हून पुढे येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्‍ट्र मेडीकल कॉन्सिलकडून अशा वैद्यकीय तज्ञांची माहिती मिळाल्यास त्‍यांच्‍या सेवा कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी घेता येवू शकतील, असेही विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितले.

Exit mobile version