मुंबई : कोरोना सोबतच ‘सारी’ या आजारासंबंधी माहिती घेण्यासाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे आरोग्य सचिव व संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन श्री.अनुपकुमार व वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली. उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज असल्याचे सांगितले.
चर्चेअंती आरोग्य विभागाने ‘सारी’प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ताप तपासणी दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या ‘फिव्हर क्लिनिक’ च्या माध्यमातून ताप/ सर्दीची लक्षणे असलेल्या सर्वांची तपासणी व औषधोपचाराची व्यवस्था सर्व शहरांमध्ये व तालुक्यांच्या ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटर सोबतच ही फिव्हर क्लिनिकही कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तत्संबंधीचा शासनादेश लवकरच जारी करण्यात येईल.