नवी दिल्ली : देशव्यापी संचारबंदी 3 मे पर्यंत वाढ झाल्यामुळं भारतीय रेल्वेनं सर्व प्रवासीगाड्यांची वाहतूक ३ मे पर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे ३ मे पर्यंत सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, लोकल, मेट्रो आणि इतर प्रवासी रेल्वेगाड्या बंद राहणार आहे. पुढील आदेशापर्यंत रेल्वे तिकिटांचे आरक्षण सुरू न करण्याचे आदेशही रेल्वे बोर्डाने दिले आहेत.
संचारबंदीच्या कालावधीतल्या प्रवासाच्या आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाणार आहे. IRCTC ची वेबसाइट किंवा ऐपवरून आरक्षित केलेली तिकिटं रद्द न करण्याचं आवाहन रेल्वेनं केलं आहे. ऑनलाइन तिकिट आरक्षित केलेल्या सर्वांना तिकीट रद्द न करता पूर्ण परतावा मिळणार आहे. तिकीट खिडकीवरुन आरक्षण केलेल्यांना मात्र संचारबंदीनंतर तिकिटे रद्द करण्यासाठी जावे लागेल. या सर्वांना तिकिटे रद्द करण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची मुदत रेल्वेने दिली आहे.
संचारबंदीच्या कालावधी रेल्वेने होणारी माल वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. संचारबंदी दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे.