पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या लोकांचे खूप हाल होत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे रस्ते सुनसान असल्याने रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या भुकेची व अन्नाची समस्या निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक सामाजिक संस्था अशा लोकांसाठी अन्नदान करीत आहेत. परंतू रस्त्यावरील भटकी कुत्री उपाशी पोटी फिरत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वाकड येथील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सुखदा आगरवाल या महिला भगिनी पुढे आल्या आहेत. त्या आपली आई अनिता आगरवाल व घरकाम करणाऱ्या मावशी सुमन मोरे यांच्या मदतीने दिनांक 20 मार्च पासून दररोज पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, काळेवाडी येथील भटक्या कुत्र्यांना रात्रीच्या वेळेस अन्नदान करीत आहेत. यासाठी त्या दररोज पंधरा ते वीस किलो चिकन भात व बिस्किटांचे वाटप करीत आहेत.
तसेच या परिसरातील गोरगरीब लोकांसाठी मसाला भात, साबुदाणा खिचडी, इडली, पॅटिस,उपमा, बिस्किटांचे वाटप करीत आहेत. दररोज रात्रीच्या वेळेस हे वाटप कार्य सुरू आहे.