पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूने जगभरात हाहा:कार माजविला आहे. राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन (संचारबंदी)चा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडॉऊनच्या काळात शहरातून गावी जाणा-या नागरीकांना प्रतिबंध करुन त्यांची राहण्याची, खाण्याची सोय मनपाने शहरातील वेगवेगळ्या निवारा केंद्रात केलेली आहे.
त्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा दिला जात असून त्यांची महापालिकेने काळजी घेतली आहे. हे पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कामगार वर्ग जास्त आहे. त्यापैकी ब-याच कामगारांचे हातावर पोट असून, दैंनदिन मोलमजुरी करुन आपली उपजिविका चालवितात. सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे या नागरीकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
लॉकडाऊनमुळे घर सोडू शकत नाहीत व घरी खायला काही नाही, अशी अवस्था झालेली आहे. मागील पंधरा दिवसापासून अशा नागरीकांना स्थानिक नगरसदस्यांकडून, सामाजिक संस्था यांच्याकडून यथाशक्ती मदत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात स्थानिक नगरसदस्यांशी समन्वय ठेऊन साधारणपणे 300 नागरिकांच्या शिधा अथवा जेवणाची सोय करण्यात यावी.