Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी

घरभाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये – अपर मुख्य सचिव गृहनिर्माण

मुंबई : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व घरमालकांना दिल्या आहेत.

लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यवसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.

या परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व संबंधित घरमालकांना अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Exit mobile version