Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोविड१९ ची महामारी आणि त्याला प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांदरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून त्यातून सावरण्याच्या दृष्टीने आणखी काही उपाय रिझर्व बँकेनं जाहीर केले आहेत.

बाजारात तरलता वाढवण्याच्या उद्देशानं रिव्हर्स रेपो दरात पाव टक्के कपात करुन तो पावणेचार टक्के केला आहे. हा दर तात्काळ लागू झाला आहे. या उपाययोजनांमुळे बँकांकडे आणखी रोख रक्कम उपलब्ध होईल.

रिझर्व बँकेकडून दीर्घ मुदतीची अतिरिक्त कर्जं बँकांना उचलता येतील. शिवाय, नाबार्ड, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, सिडबी अशा संस्थांना ५० हजार कोटी रुपयापर्यंत पुनर्वित्तपुरवठा करण्याची मुभा दिली आहे. बँकांनी आताच्या परिस्थितीत लाभांश वाटप करू नये, अशी सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे. मार्च महिन्यात निर्यातीत झालेली सुमारे साडे चौतीस टक्के घट काळजीचं कारण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

कोरोना प्रादुर्भावाचं संकट निवळल्यानंतर देशाचा आर्थिक विकास दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के एवढा होऊ शकतो, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असून, जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. महागाईचा दरही खाली येत असून, या आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत तो चार टक्क्यापर्यंत कमी होईल, असा अंदाजही दास यांनी वर्तवला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचं दास यांनी नमूद केलं.

Exit mobile version