- युवा उद्योजक अमोल चौधरी यांच्याकडे दररोज तयार होताहेत दोन हजार पीपीई किट्स
● महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात वितरण; केंद्र सरकार आणि विविध राज्यांकडून होतेय विचारणा
नाशिक : कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी सांभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीई किट्स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीई किट्स तयार करण्याची परवानगी दिली असून येथे दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यसाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते.
मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीई किट्स) परिधान करणे आवश्यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीई किट्स वापरावी लागतात, अनेक डॉक्टर्स स्वखर्चाने हे किट्स खरेदी करण्यास तयार आहेत. देशात मोठ्या प्रमाणात पीपीई कीट्सची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीई किट्स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहे. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने ही पीपीई किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.
पीपीई किट्स तयार करताना येथील कामगारही घेतात दक्षता
राज्य शासनाने नाशिकचे अमोल चौधरी यांना पीपीई किट्स निर्मितीची परवानगी दिली असून त्यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीई किट्स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीई किट्स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीई किट्स निर्मिती केली जात आहे.
दृष्टिक्षेपात ‘डॉक्टरांसाठी कोरोना सुरक्षा कवच’
- कोरोना पासून डॉक्टर्स व आरोग्य कर्मींच्या बचावासाठी नाशिकचे युवा उद्योजक अमोल चौधरी यांनी सुरू केली पीपीई किट्स ची निर्मिती.
- महाराष्ट्र शासनाच्या परवानगीमुळे रोज होत आहे 2000 किट्स ची निर्मिती.
- सद्यस्थितीत राज्यासह, देशात अशा किट्स चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा.
- पंधराशे ते सतराशे रूपयांचे पीपीई किट्स अवघ्या 750/- रूपयांत निर्मिती.
- लॉकडाउन च्या परिस्थितीत ही कच्चा माल शोधून निरंतरपणे सुरू आहे निर्मिती.
- विशेष म्हणजे किट तयार करताना त्याच्या निर्मितीच्या तांत्रिक वैद्यकीय निकषांची घेतली जात आहे काळजी.
- लॉकडाऊनच्या कालावधीत उत्पादन अखंड चालू रहावे यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, परिवहन विभाग यांनीही दिल्या अत्यावश्यक म्हणून मान्यता.