Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वस्त धान्य दुकानातुन बटाट्यांचे मोफत वाटप…

वाकोद येथील रेशन दुकानदार मनोहर लहाने यांचा उपक्रम…

औरंगाबाद : वाकोद (फुलंब्री) येथे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील 305 रेशन कार्डधारकांना प्रत्येकी दोन किलो बटाटे मोफत देण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू मोफत, स्वस्त दरात देण्याच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वाकोद येथे धान्याबरोबर गावातील नागरिकांना बटाटे मोफत देण्यात आला आहे… जाणून घेऊया या यशकथेविषयी…

वाकोद…फुलंब्री तालुक्यातील एक लहानसं गांव…इतर गावांप्रमाणेच कोरोनाशी लढा देणारं गांव… गावात हिम्मतराव लहाने यांचं रेशन दुकान… नेहमीप्रमाणे गावात आलेल रेशन गांवकऱ्यांना वाटण्याचा दिनक्रम सुरूच होता… हिम्मतरावांचा मुलगा मनोहर हे रोजच पाहत असे… कोरोनाच्या संकटात शासन स्वस्त धान्य दुकानामार्फत गरिबांना धान्याच्या माध्यमातून मदत करतच आहे… पण समाजाप्रती आपणही काही देणं लागतो या जाणीवेपोटी मनोहर अस्वस्थ होत…गरीबांसाठी काहीतर केलं पाहिजे ह्या विचाराने कामाला लागला… आणि त्याला एक भन्नाट कल्पना सुचली…

मनोहरकडे दीड एकर शेती होती त्यापैकी 10 गुंठ्यामध्ये त्याने बटाटा लावलेला होता. समाजाप्रती काही तरी देणं लागतो या विचाराने त्याने आपल्या शेतातले बटाटे रेशन घेण्यासाठी येणाऱ्या गरिबांना आणि शेतकऱ्यांना मोफत वाटण्याचा निर्णय त्यांनी आणि त्यांच्या वडीलांनी घेतला. गावांत साधारण 306 कार्ड धारक आहेत. यामध्ये बी.पी.एल, अंत्योदय योजनेतील कार्डधारकांचा समावेश आहे.

नेहमीप्रमाणे कार्डधारक त्यांच्या दुकानावर रेशन खरेदीसाठी आले की ते प्रत्येक कार्डधारकांना 2 किलो बटाटे मोफत देऊ लागले. त्यांच्या या कृतीने कार्डधारक भारावुन गेले आणि त्यांना मनातून आशीर्वाद देऊ लागले…त्यांच्या या कार्याचं कौतुक सर्व गांवकरी करत आहेत.  साधारणपणे 10 गुंठ्यामध्ये अडीच क्विंटल बटाटा निघण्याची अपेक्षा आहे. निघेल तेवढा बटाटा गोरगरीब गांवकऱ्यांना मोफत वाटण्याचा मनोहर यांचा मानस असल्याचे सांगूण ते म्हणाले की, रोज किमान 30 ते 40 कार्डधारक रेशन घेऊन जातात दिवसभरात जेवढे कार्डधारक येतील त्यांना प्रत्येकी 2 किलो बटाटे देणार आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीबांसाठी ह्या मध्यमातून माझ्याकडून खारीचा वाटा उचलला जात आहे यामध्ये मला समाधान असल्याचे मनोहर म्हणाले.

मनोहर यांची ही मदत छोट्या स्वरुपातील असली तरी गरीबांसाठी आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी नक्कीच मोठी ठरणारी आहे… अशा प्रकारचे मनोहर गावागावांत निर्माण होणे गरजेचे आहे तरच लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदत मिळले… एवढं मात्र नक्की…

Exit mobile version