मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात रोजगार बंद झाल्याने जनधन खातेधारकांना अर्थसहाय्य म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यावर ५०० ₹ चा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. पण या अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी लॉकडाऊन असताना देखील गरजू लोकांची बँकांमध्ये गर्दी होऊ लागली. परिस्थितीचे गांर्भिर्य लक्षात न घेता बॅंकामध्ये लोक गर्दी करत होते हे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. ही परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी बँक सखी असलेल्या सोनाली वैजिनाथ उबाळे या बँक प्रशासन आणि खातेधारकांना सहाय्य करण्याची कामगिरी आपल्यापरीने उत्तमरित्या पार पाडत आहेत.
श्रीमती सोनाली उबाळे या प्रेरणा महिला स्वयं सहायता समूह गणोरी ता. फुलंब्री अंतर्गत सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातून त्यांची बँक ऑफ बडोदाच्या गणोरी येथील शाखेत बँक सखी पदावर निवड झालेली आहे. बॅंक सखी म्हणून गावातील महिलांना खाते उघडणे, पैसे काढणे/भरणे, विमा योजना व इतर विविध बाबींवर मार्गदर्शन करण्याचे काम श्रीमती सोनाली करत असतात.
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी बॅंकेत ही फिजिकल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करत काम सुरु होते. पण जनधन योजनेतंर्गत खात्यावर आलेले पैसे काढण्यासाठी खातेदारांनी एकदम बॅंकेत येण्यास सुरवात केल्याने नियमापेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली. ती गर्दी रोखणे हे बॅंक अधिकारी यांच्यापुढे मोठे आवाहन होते पण गर्दी न होता खातेदारांना व्यवस्थितपणे पैसे मिळणे ही आवश्यक होते. त्यावेळी बँक व्यवस्थापक यांच्या सूचना नुसार ही गर्दी कमी करण्यासाठी बॅंक सखी सोनाली यांनी आपल्या उमेद अभियानामधील गटांतील महिलांसाठी निश्चित वेळा ठरवून त्यांना त्यानुसार पैसे घेण्यासाठी येण्याचे नियोजन केले.
त्यांनी या महिलांना फोन, मेसेज करून कोणत्या दिवशी बँकेत यायचे आहे त्याबाबत सांगितले. त्याचबरोबर खात्याची सम,विषम क्रमांक रचना तसेच सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायजर वापरणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत माहिती देत खबरदारी घेण्याची निकड समजून सांगत आहेत.
कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करत बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या अशिक्षित महिलांना पैसे काढण्यासाठीची पावती भरून देणे, त्यांचे पासबुक प्रिंट करून देणे, रजिस्टरला नोंदी करणे या कामी मदत करुन प्रत्येक महिलेचे काम लवकर होण्यासाठी पर्यायने बॅंकेत गर्दी होणार नाही यासाठीची दक्षता त्या घेत आहेत. या कालावधीत त्यांनी अभियानातील १८ महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत सुरु करुन दिले आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजनाची माहिती देऊन २३ महिलांना विमा संरक्षण मिळवून दिले आहे. शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीमध्ये गणोरी बॅंक शाखेचे काम उत्कृष्ट असून यात सोनाली यांचा सक्रिय सहभाग आहे.
शिक्षण पूर्ण करुन चांगेल काही काम करण्याची इच्छा असलेल्या सोनाली यांना प्रेरणा महिला स्वयंसहायता समूहाच्या सदस्य झाल्याने प्रगतीची प्रेरणा मिळाली. या अडचणीत आपल्याला जे जमेल ते करायचं हा विचार करुन मी माझ्यापरीने शक्य होईल ते प्रयत्न करत लोकांना सहकार्य करण्याची छोटीशी का होईना धडपड करत आहे, अशा भावना व्यक्त करणाऱ्या काही वर्षांपूर्वी शेतात कामाला जाणाऱ्या श्रीमती सोनाली यांनी बँकेच्या टॅब या नवीन तंत्रसाधनाचा वापर करुन जन धन खाते उघडण्याची जबाबदारी पार पाडली आहे. बँकेने दिलेले ATM कार्ड महिलांना वाटप करण्याबरोबरच कार्ड वापरून व्यवहार कशा प्रकारे करावयाचे आहेत याबाबत महिलांना मार्गदर्शन केल्याने आज ग्रामीण भागातील या महिला सहजतेने त्याचा वापर करत आहेत. तसेच या लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार, कामे ठप्प झाल्यामुळे अनेकांना पैशाची आवश्यकता निर्माण झाली होती. अशा गरजू महिलांना गटातील पैसा कसा वळवावा, अतिरिक्त कर्ज कसे घ्यावे याबाबतही त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत सहकार्य केले आहे.
कोरोनाचे युद्ध जिंकण्यात सोनाली सारख्या असंख्य जणांची सक्रियता मोलाची ठरणार आहे.