कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे गृहमंत्री देशमुख यांच्याकडून कौतुक
अहमदनगर : पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांनी त्याचा त्याच कारणासाठी वापर करणे आवश्यक आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ जणांवर राज्य शासनाने पर्यटन व्हिसा नियमाचा भंग केल्याबद्दल कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधीत व्यकींच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
गृहमंत्री श्री. देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना प्रतिबंध विषयक आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये सहभागी झालेले १ हजार ४०० तब्लिगी राज्यात आले होते. हे सर्वजण सापडले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या १५६ जणांना आपण अटक केली आहे. पर्यटक व्हिसाचा दुरुपयोग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली आहे. मरकजचा दिल्ली प्रमाणेच राज्यात वसई येथेही कार्यक्रम घेण्याचे तब्लीगीचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना परवानगी नाकारली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात १२ मार्चला कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर १३ एप्रिलपर्यंत एकूण २७ रूग्ण आढळले. मात्र, प्रशासनाने, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेने लॉकडाऊन काळात चांगली भूमिका बजावल्याने १३ एप्रिल नंतर जिल्ह्यात एकही रुग्णाची वाढ झाली नाही. जिल्ह्यातील हॉटस्पॉट जाहीर केलेल्या ठिकाणीही प्रशासनाने चांगली भूमिका बजावली आणि नागरिकांना सुविधा पुरविल्या जात आहेत, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागातही चांगल्या उपाययोजना राबविल्या. बाहेरून जिल्ह्यात आलेल्या १ लाख ६० हजार लोकांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले. ज्याठिकाणी बाधित व्यक्तींच्या दूर संपर्कातील व्यक्ती असेल अशा व्यक्तींना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले. जिल्ह्यात सध्या ५६०० बेडसची व्यवस्था आहे. आपत्कालीन परिस्थितीत २८ हजार बेडस उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.