Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात २३० गुन्हे दाखल

बीड, नाशिक ग्रामीण मध्ये नवीन गुन्हे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २३० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C)आहेत.

त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १६, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, , ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की व्हिडिओ, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक (titktok) व्हिडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब्‍) गैरवापर केल्या प्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे. यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.

बीड- नाशिक ग्रामीण

बीड शहरांतर्गत असणाऱ्या पेठ पोलीस स्टेशनमध्ये काल अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्यात नोंद झालेल्या सर्व गुन्ह्यांची संख्या २७ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर (फेसबुक इत्यादी) सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देऊन, दोन धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या होत्या .

नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने, कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या, या विषाणूमुळे प्रादुर्भावित परिसर, याबाबत चुकीची माहिती कोणतीही खातरजमा किंवा उपलब्ध सरकारी माहिती बरोबर न तपासता, व्हाट्सॲप ग्रुपवरून पसरविली होती. ज्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याचा संभव होता.

ग्रुप सेटिंगमध्ये केवळ ॲडमिन (only admin) सेट करा

सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्हाट्सॲप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अशा फॉरवर्ड मेसेजेसवर अंध विश्वास ठेवू नका. सर्व व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप निर्माते (owners) यांच्यावर विशेष जबाबदारी आहे की, या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाऊनच्या काळात आपल्या व्हाट्सॲप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्या. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. ग्रुप सेटींग काही काळाकरिता केवळ ॲडमिन ‘only admins’ करा. एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) द्या.

कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

Exit mobile version