नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड 19च्या रुग्णांमध्ये दररोज भर पडत असली, तरी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी, १४ एप्रिलला बाधितांची संख्या २०४ होती. त्यानंतर ही संख्या टप्प्याटप्प्यानं घटत गेली. काल १७ एप्रिलला ७७ नवे रुग्ण आढळले. कोरोनामुक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत धारावीमधली कोरोनाबाधितांची संख्या आता शंभरच्या पुढं गेली आहे. या पार्श्वभूमीवर खास धारावीसाठी आजच डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची भरती होत आहे. काल १५ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांची संख्या आता १०१ झाली आहे. शिवाय १० रुग्ण मरण पावले आहेत. मुंबईतल्या आंग्रे नौदल तळावरच्या २१ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.
पुण्यात एका पोलीस शिपायाला आणि त्यांच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.या दोघांना पिंपरी चिंचवडच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६५ रुग्ण आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात आणखी चार कोरोनाबाधित आढळले असून त्यामुळे नाशिक शहरातल्या बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे. दरम्यान, मालेगाव इथं आज प्राप्त झालेल्या २८ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एका ३५ वर्षांच्या संशयिताचा आज मृत्यू झाला. मात्र, तो कोरोनाबाधित असल्याचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसून एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या ६१४ आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेले १८२ असून सध्या २४ नागरिक निरीक्षणाखाली आहेत. आज तपासणी साठी ५ नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण ३२७ नमुने तपासणी झाली असून ३१२ नमुने निगेटीव्ह आले आहेत, तर १० नमुन्यांचा तपासणी अहवाल येणं बाकी आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झालं असून त्यामुळे लवकरच जिल्हा करोनामुक्त होईल, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आज केला आहे. ते आज करोनाविषयक कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय. एका रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवलं असून इतर चौघांची प्रकृती सुधारत आहे.
सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या ३५ वर्षीय कोरोना बाधित युवकाला उपचारानंतर आज कोरोनाचे दोन्ही अहवाल नकारात्मक आल्यानं रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. १६ दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिन्ही कोरोनो विषाणू बिधीत रुग्णांचा चौदा दिवसांच्या उपचारानंतरच्या पहिल्या चाचणीचा अहवाल आज नकारात्मक आला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात अद्याप एकही नागरिक कोरोनाबाधित नसून, खबरदारीचा उपाय म्हणून एकूण २ हजार ६४३ नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे तर ७२ नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरोन्टाईनमध्ये आहेत. नव्यान तपासणीसाठी पाठवलेल्या ७४ नागरीकांच्या नमुन्यापैकी ६८ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह असून ६ नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.