Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्राकडे गुणवंत शेतकऱ्यांची शिफारस करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई : शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे गुणवंत शेतकऱ्यांची यादी पाठवून त्यांची शिफारस करणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभ वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केला होता. त्यावेळी डॉ. बोंडे बोलत होते.

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शासकीय मदत पोहोचवली. त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री असेही संबोधले जाते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हाताला काम दिले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय करावा यासाठीही त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. शेतकरी समृद्ध व्हावा हेच ध्येय वसंतराव नाईक यांनी बाळगले होते, असेही डॉ. बोंडे म्हणाले.

शेतीमध्ये संशोधन होऊन उत्पादनात वाढ व्हावी यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेतीमध्ये यांत्रिकीकरण करुन शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक उत्पन्न मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले, असेही डॉ. बोंडे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.

राज्य शासन शेतकऱ्यांसाठी जुने व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार असून पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट शेतीपर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन देणार आहोत. जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकसहभाग वाढला असून याची फलश्रुती म्हणून राज्यातील अनेक गावे पाणीयुक्त झाली आहे. जलयुक्त गावासाठी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व संस्था स्वयंप्रेरणेने काम करत असून त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे, असेही डॉ. बोंडे यांनी जलयुक्त गावांसाठी कार्य करणारे मान्यवरांना उद्देशून सांगितले.

कृषी मंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते कृषी दिन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री राजाभाऊ वाजे, हरिभाऊ राठोड, माजी मंत्री मखराम पवार, वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,संस्थेचे सचिव संजय नाईक तसेच राज्यातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये कृषी शास्त्रज्ञ संजय भावे, गुणवंत शेतकरी सुधाकर रामटेके, भालचंद्र जोशी,शेतीविषयक उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल ॲग्रोवनचे पत्रकार सुर्यकांत नेटके, कृषी उत्पादन निर्यातदार निलेश रोडे, फळ उत्पादक शेतकरी जोत्स्ना दौंड,भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रकाश राऊत, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक विश्वजित देशमुख, जलसंधारणामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे संजय करकरे आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.

Exit mobile version