कोविड –19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमणूक
मुंबई : राज्यातील अहमदनगर, मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
मुंबईतील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची सांगली येथे कोविड -19 नियंत्रणासाठी यापूर्वीच नेमणूक करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात कोविड -19 प्रसारास चांगले यश आले आहे.आता डॉ. पल्लवी सापळे आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. भारत चव्हाण हे अहमदनगर येथे जाऊन कोविड -19 च्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपचार पद्धती बरोबरच तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रोफेसर डॉ.श्रीराम गोसाई आणि याच महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अजय सुभेदार हे मालेगाव येथे जाऊन कोविड -19 च्या नियंत्रणाचे काम पाहतील. अहमदनगर आणि मालेगाव प्रमाणेच सोलापूर शहरातील कोविड -19 ची वाढती संख्या लक्षात घेता सोलापूर महापालिका आयुक्तांच्या विनंतीनुसार सोलापूर येथील डॉ.वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि याच महाविद्यालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.प्रसाद यांची सोलापूर येथील कोविड -19 नियंत्रणासाठी उपचार आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ही तज्ज्ञ डॉक्टरांची पथके तातडीने कार्यभार स्वीकारणार असून कोविड-19 ला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.