850 गावांमधून 109 बँक सखींचे योगदान
कुटुंबालाही देताहेत आर्थिक आधार
वर्धा : केंद्र व राज्य सरकारने जनधन योजनेसह विविध योजनाचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. ते काढण्याकरिता लाभार्थ्यांची बँकामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाच्यावतीने जिल्ह्यात कार्यरत 109 बँक सखीचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग धंदे पूर्णपणे ठप्प पडलेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे आणि गोरगरीबांची संचारबंदीच्या काळात परवड होऊ नये म्हणून केंद सरकारने जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 500 रुपये जमा केले आहेत. तसेच श्रावण बाळ, संजय गांधी, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत. खात्यात जमा झालेले पैसे काढण्याकरिता लाभार्थी बँकेत गर्दी करणार. ही गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन उमेद अभियानातील 109 बँक सखींना तत्परतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
योग्य सामाजिक अंतर ठेऊन महिलांना जनधन योजना व इतर योजनेची घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावस्तरावर व तालुकास्तरावर असणाऱ्या शाखामध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. बँकेची सेवा त्यांना त्यांच्या गावात व घरातच मिळत असल्यामुळे लाभार्थीचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे. तसेच बँक सखींकडे येणाऱ्यांना विशिष्ट अंतरावर उभे करून, मास्क आणि हॅन्ड वॉशचा वापर करण्यात येत असल्यामुळे आरोग्यास होणारा धोका टाळण्याचे कामही या निमित्ताने केले जात आहे.
या बँक सखींकडे बँक शाखा वाटून दिल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात 110 बँक शाखा आहेत. तर शहरी भागात 49. बँक ऑफ इंडिया साठी 24, भारतीय स्टेट बँक 16, आय डी. एफ सी 64, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 10, बँक ऑफ महाराष्ट्र 2, तर बँक ऑफ बरोडा आणि अलाहाबाद बँक प्रत्येकी एक बँक सखी काम करते. या महिलांकडे स्वापींग मशीन आणि लॅपटॉप दिले आहेत. त्या आधार क्रमांक आणि अंगठ्याच्या ठशाचा वापर करून संबंधित लाभार्थ्यांचे व्यवहार करतात.
850 गावांना मिळतोय लाभ
एक बँक सखींकडे किमान 7 गावे आहेत. ती आळीपाळीने तिच्याकडे असलेल्या गावांमध्ये सेवा देते. या 109 बँक सखीमुळे जिल्ह्यातील 850 गावातील नागरीकांची संबंधित बँक शाखेत होणारी गर्दी कमी करण्यास या बँक सखीचे मोठे योगदान आहे.
महिलांनाही मिळाला रोजगार
कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली असताना ग्रामीण भागातील या बँक सखींना मात्र यामुळे रोजगार मिळाला आहे. गावातील व्यवहारावर वेतन ठरत असले तरी या काळात बँक सखी किमान 4 ते 5 हजार रुपये कमवून कुटुंबाला आधार देण्याचे कामही करत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, प्रकल्प संचालक सत्यजित बडे, तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, सिद्धार्थ भोतमांगे- जिल्हा व्यवस्थापक-आर्थिक समावेशन, मनीष कावडे जिल्हा व्यवस्थापक-मार्केटिंग उमेद अभियान अंतर्गत तसेच तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशान,कविलास झोटिंग, प्रकाश पोलखडे, वर्षा कोहळे, रामचंद्र चोपडे, शुभागी महल्ले आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे.