औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात या लढाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनावार मात करण्यासाठी सर्वांनी यशस्वी लढा देणे गरजेचे असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीच्या आढावा बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते. यावेळी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोंदवले, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व राज्य सीमा सील करण्यात आलेल्या असून त्या सीमांवर पूर्णपणे बंदोबस्त ठेवलेला आहे. राज्य शासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये सर्व यंत्रणांचे योगदान महत्वाचे असल्याचेही गृहमंत्री यावेळी म्हणाले.
रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्याला बीड तसेच नगर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने अशा भागातून कोणीही अवैधरित्या घुसणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असून संचारबंदीचे कोटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगांव तालुक्यातील ऊसतोड कामगार राज्याच्या काही भागात अडकलेला असल्याने त्यांच्या बाबतीत विचार हेाणे गरजेचे आहे. आपल्या शेजारील जिल्ह्यातून होणारी नागरिकांच्या प्रवेशाला आळा घालण्याचे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की शहरातील ज्या भागात रुग्ण आढळले आहेत अशा 11 ठिकाणे पूर्णपणे सील केलेले आहेत. या भागांतील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 1300 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 1 लाख 90 हजार नागरिकांचे स्क्रीनींग पूर्ण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घाटीला 14 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून घाटीत 24 तास सुरू असणारी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्यापीठात देखील लवकरच लॅब सुरू करणार असल्याचेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.
महानगर पालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकांतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शहरात 13 ठिकाणी फिवर सेंटर सुरू केले आहेत. महापालिकाक्षेत्रात 1300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात 250 तर घाटीमध्ये 450 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 2 लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. तसेच 228 सारी संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 214 जणांचे अहवाल नकारात्मक आले असून 6 अहवाल येणे बाकी आहेत. आत्तापर्यंत 701 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी 125 जणांना संस्थात्मक तर 576 जणांना घरातच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे सांगून पुढे म्हणाले की, शहरातील गरजू नागरिकांना औरंगाबाद फर्स्टही एनजीओ मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. नागरिकांबरोबरच पालिकेच्या सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी 4000 मास्क आणि हातमोज्यांचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील कायदा व सुव्यस्थेची माहिती गृहमंत्र्यांना देताना सांगितले की, शहरात सायंकाळी 5 ते रात्री 11 यावेळेत कडक संचारबंदी पाळण्यात येत आहे. रमजानच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. हेच चित्र कायम ठेवण्यासाठी ग्रामीण भागात संचारबंदी प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ड्रोन तसेच सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत असून दूध, फळे तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येत आहे. ज्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातील 14 तपास नाक्यांद्वारे 24 तास पहारा देण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष हेल्पलाईनची निर्मिती करण्यात आली असल्योचही त्यांनी यावेळी सांगितले.