Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क

‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत सर्व जण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव परतवून लावण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत, अशा या आरोग्य क्षेत्रातील सैनिकांच्या संरक्षणासाठी धुळे येथील तरुण अभियंता संग्राम सुधीर लिमये यांनी कॅबिन तयार केली आहे. ती ‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेताना उपयुक्त ठरत आहे.

लॉकडाऊनमुळे अपवाद वगळता सर्वच जण घरी आहेत. ‘द हिंदू’ वृत्तपत्र वाचताना श्री. लिमये यांचे एका बातमीकडे लक्ष वेधले गेले. ती बातमी होती, ‘कोरोना’ विषाणूच्या संशयित रुग्णांचे घशातील स्वॅबचे नमुने घेण्यासाठी किओस्क (बंदिस्त कॅबिन) तयार करण्यात आल्याची. श्री. लिमये यांचा धुळे येथील औद्योगिक वसाहतीत कस्टमाइझ इंटेरिअर डिझाईन आणि फर्निचरची फॅक्टरी आहे. त्यामुळे श्री. लिमये यांना कॅबिनची कल्पना आवडली. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉ. स्मितेश देसले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. पी. सांगळे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर श्री. लिमये यांनी श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांना अशा प्रकारची कॅबिन देण्याची तयारी दर्शविली. याबाबत त्यांनी व्यवसायातील सहकारी विजय गवळे, अतुल कुलकर्णी, ग्राफिक डिझायनर श्याम अग्रवाल, जपानमध्ये वास्तव्यास असलेली बहीण व मेहुण्यांशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा प्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारची कॅबिन तयार करुन देण्याची तयारी दर्शविली. निधीचा प्रश्न उपस्थित झाल्यावर श्री. लिमये यांनी एक कॅबिन स्वखर्चाने बनवून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने संमती पत्र दिले. मात्र, लॉकडाऊनमुळे श्री. लिमये यांची फॅक्टरी बंद होती. याबाबत त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाने कॅबिन तयार करण्यासाठी पत्र दिले. तोपर्यंत श्री. लिमये यांनी डिझाईन तयार केले होते. तसेच फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून डिझाईन अंतिम केले. लांब ग्लोव्हजचा प्रश्न निर्माण झाला होता. ते कुठेच उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे श्री. लिमये यांनी रेनकोटचे हात कापून बसविले. तसेच पुढे नेहमीचे ग्लोव्हज लावले. त्यानंतर प्रात्यक्षिकाची प्रक्रिया पार पडली. अवघ्या २४ तासांत ही कॅबिन तयार झाली. त्यासाठी सुमारे ४५ हजार रुपये खर्च आला. या कॅबिनमुळे कोरोनाबाधित संशयित रुग्णाच्या घशाचे स्वॅब घेणे सोशल डिस्टन्स ठेवून सोयीचे झाले आहे.

—–

‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच वैद्यकीय महाविद्यालयास एक कॅबिन विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. हे डिझाईन आता विविध स्तरावरुन मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वीच बिहारमधील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या व्यवस्थापकांनी विचारणा करून डिझाईन मागितले होते. ते त्यांना उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी असा उपक्रम दक्षिण कोरिया व केरळमध्ये राबविण्यात आला आहे.

– श्री. संग्राम लिमये, अभियंता, धुळे

—–

कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांच्या घशाचे नमुने घेताना पूर्वी थेट रुग्णाशी संपर्क येत होता. त्यामुळे संसर्गाची भीती अधिक होती. या कॅबिनमुळे रुग्ण आणि स्वॅबचे नमुने घेणाऱ्यांमध्ये अंतर तयार झाले आहे. त्यामुळे संसर्गाची भीती कमी झाली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम असून तो कौतुकास पात्र आहे.

-प्रा. डॉ. मृदुला द्रविड, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

Exit mobile version