औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
अंगणवाडी सेविका करताहेत कोरोना जनजागृती
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिक देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र अशाप्रसंगी ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गरोदर, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालक योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहू नये म्हणून औरंगाबाद जिल्हापरिषदेमध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया या उपक्रमाविषयी…..
सध्याची परिस्थिती पाहता एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी तसेच एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी ठरत आहे. या माध्यमाचा प्रभावी उपयोग करुन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ग्रामीण भागातील गरोदर, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांचे वेगवेगळे व्हाट्ॲप ग्रुप बनवून त्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरवले आणि आज पाहता पाहता तब्बल ६ हजार ग्रुपच्या माध्यमातून नियमित समुपदेशनासह कोरोनाविषयक जनजागृती देखील केल्या जात आहे.
या अभिनव उपक्रमाविषयी बोलताना महिला व बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की, शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती इंद्रा मालो यांनी ९ एप्रिल रोजी सर्व जिल्हा परिषदांना अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याच्या लेखी सुचना केलेल्या आहेत. या सुचनांची आम्ही तात्काळ अंमलबजावणी करण्याचे ठरविले. जिल्हा परिषदेअंतर्गत ३४५४ अंगणवाड्या आणि तितक्याच अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. ह्या सर्व अंगणवाडी सेविकांना गरोदर, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांचे वेगवेगळे व्हाट्ॲप ग्रुप बनविण्याचे सांगण्यात आले आणि आज तब्बल ६ हजार ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नियमित समुपदेशन करत असून स्तनदा व गरोदर मातांकडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही मिरकले यांनी सांगितले.
हा उपक्रम १४ प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८० पर्यवेक्षकांच्या निरिक्षणाखाली सुरू आहे. या आयुक्तालयाच्या सुचनेप्रमाणे मुख्यसेविकांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांचा व्हाट्सॲप ग्रुप बनविला आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकेने आपल्या कार्यक्षेत्रातील पालकांचा व्हाट्सॲप ग्रुप बनवून त्यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्ष आणि ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालक असे ४ ग्रुप बनवून त्यांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
१. गरोदर मातांचा ग्रुप- या ग्रुपमध्ये वैयक्तिक स्वच्छता, आहार, घरातील कामे व विश्रांती, कोरोना विषयक जनजागृती याबरोबरच गरोदर मातेला जर एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाला देखील उत्तर दिल्या जात असल्याने या मातांना या ग्रुपचा चांगलाच फायदा होत आहे.
२. स्तनदा मातां ग्रुप- कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये आवश्यक असणाऱ्या स्वच्छतेच्या दृष्टीने बालकाला ६ महिन्यापर्यंत फक्त मातेचे दूध देण्याबाबतची माहिती, मुलाला दूध पाजताना तोंडाला मास्क लावणे, वाटी चमच्याने दूध पाजत असाल तर वाटी चमचा स्वच्छ करुन घेणे, बालकाला स्तनपान करण्यापूर्वी ४० सेकंदापर्यंत हात धुणे, बालकाला बाहेरी व्यक्ती पासून दूर ठेवणे, स्तनपान काळातील आहार व स्वच्छतेची माहिती देण्याबरोबरच स्तनपान योग्य पद्धतीने कसे करावे याबाबतची व्हिडीओद्वारे देखील माहिती देण्यात येते.
३. ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील मुलांच्या पालकांचा ग्रुप- या ग्रुपमध्ये मुलांना द्यावयाचा वरच्या आहाराबाबतची माहिती, वैयक्तिक स्वच्छताबाबत माहिती व व्हिडीओ, मुलांबरोबर घ्यावयाच्या कृतीची माहिती व व्हिडीओ, मुलांबरोबर बोलणे, गोष्ट सांगणे, गाणी म्हणणे, खेळणे त्यांना कामात सहभागी करुन घेणे अशा प्रकारची माहिती देण्यात येते.
४. ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या पालकांचा ग्रुप – या वयोगटातील मुलांसाठी आकार अभ्यासक्रमांतर्गत मुलांसाठी गाणी, गोष्टी, खेळ, वाचन गणन पूर्व तयारी कृती, प्रार्थना, राष्ट्रगीत इ. माहिती, चित्रे व व्हिडीओ, मुलांबरोबर पालकांनी करावयाच्या कृतींची देखील माहिती देण्यात येते.
या उपक्रमाच्या माध्यमातून रोज कशा प्रकारे काम चालते याविषयी सांगताना करमाड प्रकल्पाच्या सुपरवायझर श्रीमती सुनीता रामचंद्र परदेशी म्हणाल्या की, नियमित येणारी माहिती सेविकेने पालकांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर टाकण्यात येते. ही माहिती पाठविल्यानंतर ग्रुपमधील पालक त्यांनी केलेल्या कृतीचे फोटो/ व्हिडीओ सेविकेला पाठवितात. सेविका हे फोटो/व्हिडीओ मुख्यसेविकेला आणि मुख्यसेविका संबंधित बालक विकास प्रकल्प अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना पाठविण्यात येत असल्याने यावर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही श्रीमती परदेशी म्हणाल्या.