Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘माविम’च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत

बचत गटांच्या महिलांच्या एक-एक रुपयाने बनली लाखोंची रक्कम

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी 1 रुपये आणि माविमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’चे आणि बचत गटाच्या महिलांचे कौतुक केले आहे.

कोविडविरोधी लढ्यामध्ये ‘माविम’च्या महिला बचत गटांच्या महिला भरीव योगदान देत आहेत. बचत गटांमार्फत 10 लाखाहून अधिक मास्कची निर्मिती आणि ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करण्यात आली आहे. याशिवाय आतापर्यंत सुमारे 60 हजार लाभार्थ्यांना शिवभोजन, मजूर, ऊसतोड कामगार, माथाडी कामगार आदींसाठी जेवणाची सोय, माफक दरात साडेबारा हजार टनाहून अधिक भाजीपाल्याची माफक दरात विक्री, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी उपक्रमांद्वारे समाजाला दिलासा देण्याचे काम केले आहे.

मंत्री ॲड. ठाकूर यांनी महिला व बालविकास विभागातील सर्व घटकांनी कोविडविरोधी लढ्यात शासनासोबत काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी ‘माविम’च्या बचत गटांतील महिलांनी मुख्यमंत्री सहायता निधीत प्रत्येकी 1 रुपये योगदान देण्याची संकल्पना मांडली होती. माविमचे राज्यात सुमारे सव्वालाख बचत गट असून त्यात सुमारे 16 लाख महिला सदस्य आहेत. त्यापैकी बहुतांश महिलांनी प्रत्येकी 1 रुपयाचे योगदान दिले असून माविमचे राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन असे मिळून एकूण 11 लाख 35 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दिली.

Exit mobile version