नवी दिल्ली : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या एका अहवालानुसार, देशातल्या एकूण मृत्यूपैकी अ-संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे 2016 मधे 61.8 टक्के प्रमाण होते. 1990 मधे हे प्रमाण 37.9 टक्के होते.
अ-संसर्गजन्य रोगासाठी, वार्धक्य, अनारोग्यकारी आहार, बैठी जीवनशैली, उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, प्रमाणाबाहेर वाढलेले कोलरेस्टोल, वाढलेले वजन हे घटक कारणीभूत ठरतात.
सार्वजनिक आरोग्य हा राज्यांच्या सुचीतला विषय असला तरी राज्य सरकारांच्या प्रयत्नांना, केंद्र सरकारचा सहयोग लाभतो. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत, कर्करोग, मधुमेह, पक्षाघात आणि हृदयविकार नियंत्रण आणि अटकाव यासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जातो. आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याबरोबरच, कर्करोगासह इतर अ-संसर्गजन्य रोगांची तपासणी हा याचा उद्देश आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, मुख आणि स्तनाचा कर्करोग यासारख्या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या अ-संसर्गजन्य रोगांसाठी, लोकसंख्येच्या आधारावर तपासणीलाही राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सुरवात करण्यात आली आहे. यामुळे प्राथमिक स्तरावरच रोगाचे निदान होऊन रोगासाठी धोकादायक ठरणाऱ्या घटकाबाबत जागृती निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.
सुरु करण्यात आलेल्या नवीन एम्स मध्ये कॅन्सर उपचारांवर भर आहे. रुग्णांना, कर्करोग आणि हृदय विकाराशी संबधित औषधे आणि प्रत्यारोपण माफक दरात उपलब्ध व्हावीत यासाठी 159 संस्था आणि रुग्णालयात दीनदयाळ कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. माफक दरात जेनरिक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जन औषधी भांडार उघडण्यात आली आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.