नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601 झाली असून 590 रुग्ण मरण पावले. 3 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत.
राष्ट्रपती भवनातल्या एका सफाई कामगाराच्या नातलगाचा कोविड १९ मुळे मृत्यू झाल्याचं निदर्शनाला आल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरातली शंभर कुटुंबं स्वविलगीकरणात रहात आहेत. एका कर्मचाऱ्याची आई या आजारानं मरण पावली, ही महिला या परिसरात राहत नव्हती, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या सर्व नातलगांची कोरोना तपासणी केली असून त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हे सर्व लोक विलगीकरणात राहत असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
राज्यात काल आणखी 472 नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा 4 हजार 676 झाला आहे. या आजारानं राज्यात काल नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळं मृतांची एकूण संख्या 232 झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने शहरात कोरोना विषाणू चाचणीला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल महाविद्यालयात ही प्रयोग शाळा सुरू होणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या दुसरा तर शहरातील पहिला कोरोनाबाधीत रूग्ण उपचारानंतर बरा झाला. त्याला काल नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयातल्या 19 नर्सेस आणि इतर सहा कर्मचार्यां्ना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. या सर्वांमध्ये सध्या कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणं आढळली नव्हती.
रायगड जिल्ह्यात 49 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यातले ३४ पनवेलमध्ये तर १५ जण ग्रामीण भागातले आहेत. काल रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले. रायगड जिल्ह्यातले सहा तालुके हॉटस्पॉट असल्याने तिथे सर्व निर्बंध कायम आहेत. उर्वरित तालुक्यात टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
सांगलीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर तो काम करत असलेली बँकेची इमारत सील करण्यात आली. बँक सील करण्यापूर्वी मनपाच्या पथकाने या बँकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल अखेरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याच्या संपर्कात आलेल्या 98 लोकांची यादी महापालिकेला मिळाली आहे. पुढचे 14 दिवस बँक बंद ठेवली जाणार आहे.