निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार लाभ
यवतमाळ : निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्याला 83 लक्ष 45 हजार 284 रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा झाली असून वरील योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन तसेच संचारबंदीची झळ सर्वांनाच पोहोचत आहे. रोजगार नसल्यामुळे दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण होत आहे. त्यामुळे निराधार तसेच वृद्धापकाळ असणाऱ्या लोकांना मिळणारे अर्थसहाय्य त्वरीत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालकमंत्री श्री.राठोड यांनी वित्त व कोषागार विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी केली. तसेच जिल्ह्यातील अशा लोकांसाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेकरीता 41 लक्ष 7 हजार 884 रुपये, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेकरीता 33 लक्ष 91 हजार 100 रुपये, इंदिरा गांधी निराधार वृद्धापकाळ योजनेकरीता 8 लक्ष 43 हजार 900 रुपये, इंदिरा गांधी अपंग योजनेकरीता 2400 रुपये असे एकूण 83 लक्ष 45 हजार 284 रुपये जिल्हा कोषागार कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 43860 लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे 81955 लाभार्थी तर इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 39590 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर हा निधी वळता करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
००००००