पाणी टंचाईच्या कामांचा घेतला आढावा
वर्धा : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असले तरी कोरोनाच्या कामामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईचा आढावा पालकमंत्री श्री.केदार यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, उपवन संरक्षक सुनील शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
पाणी टंचाईबाबत सर्व गटविकास अधिकारी यांचेकडून गाव निहाय पाणी टंचाईबाबत माहिती घेण्यात यावी. टंचाई काळात कोणत्याही गावातली दुरुस्ती नाकारण्याची कारणे द्यावीत. तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे काम वीज जोडणी अभावी थांबू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामासंदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर कामे अपूर्ण राहण्यास विलंबाची कारणे देण्यासही त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करतात, शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देते, प्रशासन तांत्रिक, प्रशासकीय मान्यता देते आणि तरीही पाच – पाच वर्षे लोकांना पाण्यासाठी थांबावं लागत असेल तर यापेक्षा दुसरे अपयश नाही अशा शब्दात त्यांनी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली.
पाणी टंचाई आराखड्यात 503 कामांना मंजुरी
एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात 360 टंचाई भासणाऱ्या गावांसाठी 503 उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी 60 लक्ष 4 हजार रुपये खर्च होणार आहेत. टप्पा तीन आराखड्यातील सर्व कामे एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले. यामध्ये प्राधान्याने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. सार्वजनिक विहिरी खोल करण्यासोबतच खाजगी विहिरींचे अधिग्रहण करावे. तसेच नवीन विंधन विहिरीसाठी आवश्यकतेनुसार कामांची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी दिल्या.