अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ नागरिकांना माहे मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात यावा असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत त्यांनी नाशिक येथील कार्यालयात राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सचिव संजय खंदारे, शिधापत्रिका नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे आदी उपस्थित होते.
एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच १४ जिल्ह्यांतील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही अशा एपीएल (केशरी) शिधापत्रिकांची संख्या ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एवढी असून त्यावरील सदस्यांची संख्या ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ एवढी आहे, त्या लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत नसल्याने, देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना २ महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केशरी कार्ड धारकांना गहू 92532 मे.टन व तांदूळ 61 हजार 688 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यानुसार एपीएल (केशरी) मधील सदर लाभार्थ्यांना गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य माहे मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार आहे. या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात यावे, अन्नधान्य वाटप करताना रास्त भाव दुकानदाराने त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्यात यावी. सदर अन्नधान्य उचित लाभार्थ्यास देण्यात येत आहे याची खातरजमा करावी. सदर अन्नधान्याच्या वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. रास्त भाव दुकानदारास लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील देय असलेले मार्जिन सदर अन्नधान्याच्या वितरणाकरिता देखील देण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत.