Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीच्या फळांचे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन यांच्यात पर्यटन व कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान होणे गरजेचे असल्याचे मत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. ते चीनच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री श्री. रावल यांनी चीनच्या शिष्टमंडळाबरोबर विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाचे गाओ गँगबिन, टांग क्यूकाई, यु हुआडोंग, हुबिन,लिव्ह झीजिन तसेच पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, पर्यटन संचालक दिलीप गावडे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना मंत्री श्री. रावल म्हणाले की, महाराष्ट्रात व्याघ्र अभयारण्य, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, अजिंठा- वेरूळ सारख्या पुरातन लेणी, असंख्य गडकोट किल्ले, समुद्र किनारे अशी वैविध्यपूर्ण पर्यटन संपदा आहे. या बाबतीत आपल्या देशात माहिती द्यावी व या पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात यावे. त्याचबरोबर महाराष्ट्रात उत्तम प्रतीची फळे व कृषी उत्पादन घेतले जाते. यासाठी चीन आणि महाराष्ट्रामध्ये सहकार्य योजना होणे गरजेचे आहे. त्यासाठी उभयतांमध्ये शासन-प्रशासन पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. तसेच आपण महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभारणीत गुंतवणूक, अन्न प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आदान-प्रदान बाबत सहकार्य व गुंतवणूक करण्याचेही आवाहन चीन शिष्टमंडळाला मंत्री श्री. रावल यांनी केले. या आवाहनाला चीन शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महाराष्ट्र व चीनमध्ये लवकरच  प्रशासकीय पातळीवर एक संयुक्त कार्यक्रम बनवून एकमेकांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

चीनच्या शिष्टमंडळाला यावेळी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे,कलासंस्कृती व लोकजीवन आदी बाबीची विस्तृत माहिती देणारी‘मी महाराष्ट्र’ ही पर्यटन विभागाने तयार केलेली इंग्रजीतील चित्रफित  दाखवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, ताडोबा व्याघ्रप्रकल्प,भंडारदरा, चिखलदरा, लोणार सरोवर, महाबळेश्वर आदी निसर्गसौंदर्य लाभलेली पर्यटनस्थळांची माहिती चित्रफितीद्वारे मांडण्यात आली. तसेच श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवणाऱ्या जेजुरी व पंढरपूर वारीचेही यावेळी दर्शन घडविण्यात आले.

Exit mobile version