नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज मंत्रालयात बैठक झाली. या योजनेबाबत केंद्र शासनाने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम उपस्थित होते. यावेळी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, कृषि आयुक्त सुहास दिवसे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
योजनेंतर्गत लाभ देण्याचे निकष, विमा संरक्षण रक्कम, विमा दर, उंबरठा उत्पादन, जोखीमस्तर निश्चित करणे, पीक कापणी प्रयोगाचे नियोजन आदीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, सचिव राजीव मित्तल, भारतीय कृषि बॅंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.