Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात कार्यालयीन उपस्थितीत सूट

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई :  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना लॉक डाऊनच्या काळात कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनेही याबाबत मागणी केली होती.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यलयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना आता उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे.

सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, अशा वेळी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. तसेच राज्यात लागू असलेल्या संचारबंदी मुळे वाहतूक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत; याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातून लॉक डाऊनच्या काळात सूट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अपंग आयुक्तालया मार्फतही याबाबतही या संबंधी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता.

अखेर धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करत आजपासून सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्याना लॉक डाऊन संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत उपस्थित राहण्यापासून सूट जाहीर केली आहे.

या निर्णयासह यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री श्री. मुंडे यांचे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

Exit mobile version