नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यानुसार कोविड १९ च्या साथीच्या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे अजामीनपात्र गुन्हा समजलं जाणार आहे. हे गुन्हे करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कैद तसेच ५ लाखापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
याप्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाणार असून वर्षभरात शिक्षा सुनवली जाणार आहे. तसेच वाहन आणि रुग्णालयाचे नुकसान केल्यास बाजारभावाच्या दुप्पट दंड वसूल केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणी केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
डॉक्टर्स, नर्सेस आशा कार्यकर्त्यांना 50 लाखापर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने यापूर्वीचे घेतला असल्याचं जावडेकर यांनी सांगितले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड १९ च्या रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील.
देशात आतापर्यंत ७२३ कोविड रुग्णालय उभारण्यात आली असून सुमारे 2 लाख विलगीकरण खाटा, 24 हजार अति दक्षता केंद्र आणि 12 हजार 190 व्हेंटिलेटरची सोय केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.