Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई मनपा बरखास्त करून टाका!

मुंबई : मुंबई तुंबली की सरकारला जाग येते. आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचं काम पूर्ण होत नाही. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता आहे. लोकांनी किती काळ सहन करायचं? गरज भासल्यास प्रशासक नेमा! मनपा बरखास्त करून टाका! दोषींवर कारवाई करा! अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरवर्षी मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते. सरकारनं खबरदारी न घेतल्यानं किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले ‘स्मार्ट सिटी’ करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे. सरकारचा बेजबाबदारपणा आहे.

मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबले आहे आणि मुंबईचे प्रथम नागरीक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे असा प्रश्नही अजित पवार यांनी केला.

मुंबईसह राज्यात कोसळलेल्या जलसंकटावर बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेसह सरकारवर निशाणा साधला. मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते. त्यामुळे याच्या खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

 

Exit mobile version