नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. राज्यातल्याही सुमारे ६४ टक्के रुग्णांमध्ये चाचणी पूर्वी या आजाराची कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केल्यावर हे रुग्ण आढळून आल्याची माहिती गंगाखेड़कर यांनी दिली.
पुढचे दोन दिवस रॅपिड टेस्ट किट्सचा वापर करू नका अशा सूचना सर्व राज्यांना दिल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात राजस्थानने तक्रार केली होती. त्यानंतर ३ राज्यांशी चर्चा केल्यावर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितले. या दोन दिवसात संस्थेचे सदस्य विविध ठिकाणी जाऊन या किट्सच्या चाचण्या घेतील आणि त्यानंतर या किट्स वापरायच्या किंवा नाही यासंदर्भात माहिती देऊन असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी चीनमधून रॅपिड टेस्टच्या ५ लाख किट्स भारतात दाखल झाल्या होत्या. यातून येणारे निष्कर्ष चांगले नसल्याची तक्रार सर्वप्रथम पश्चिम बंगालने केली होती. काल राजस्थानमधून सुद्धा अशीच तक्रार करण्यात आली. राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णांची चाचणी या किट्सवर केल्यावर त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे दिसून येत होते, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली आहे. त्यानंतर राजस्थानने या किट्सचा वापर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.